
जगभरातील गुंतवणूकदारांचे महाराष्ट्रात मनापासून स्वागत
खेड शहर औद्योगिक क्षेत्र संकुल, पुणे

एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत महाराष्ट्रात एकूण १०,८८,५०२ कोटी रूपये इतक्या विक्रमी थेट परकीय गुंतवणुकीची नोंद झाली. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या तुलनेत हे प्रमाण २८.५ % इतके होते. तर जून २०२० ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत महाराष्ट्रात ४.२७ लाख रोजगार संधींची क्षमता असणारे २.७४ लाख कोटी रूपये मूल्याचे गुंतवणूक प्रस्ताव प्राप्त झाले. (संदर्भ - आर्थिक सर्वेक्षण 2022-23). हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कृषीपासून अंतराळ क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे स्वागत करण्यास राज्य उत्सुक आहे. महाराष्ट्र इंडस्ट्री, ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल (MAITRI) च्या संकेतस्थळावर त्यासाठी आवश्यक सर्व तपशील उपलब्ध असून, गुंतवणूकदारांना सेवा प्रदान करण्यासाठी ही एकल खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करू इच्छित असाल तर या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
या संकेतस्थळावरून गुंतवणूकदारांना अधिकार्यांशी थेट संपर्क साधता येईल किंवा एक साधा अर्ज भरून गुंतवणूकीच्या संधीबाबतचे तपशील प्राप्त करता येतील. त्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन हवे असल्यास उद्योग संचालक यांच्याशी maitri-mh[at]gov[at]in या ईमेलवर किंवा +9122-22622362 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार या एकल खिडकी सुविधेचा लाभ घेऊ शकतात. सर्व मंजूरी मिळवू शकतात.
महाराष्ट्राला उद्योजकतेची समृद्ध परंपरा लाभली आहे. उद्योगांसाठी आवश्यक दर्जेदार आणि कुशल मनुष्यबळाबरोबरच वाहतूक संबंधी सर्वोत्तम पायाभूत सुविधा राज्यात उपलब्ध आहेत. द्रुतगती मार्गांबरोबरच रेल्वे, मेट्रोचे सक्षम जाळे राज्यात असून मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा आहेत. ७२० किमी लांबीची प्रदीर्घ किनारपट्टी राज्याला लाभली असून ५५ बंदरांवरून माल वाहतुक केली जाते. विशेष म्हणजे भारतातील एकूण माल वाहतुकीपैकी २२% वाहतूक या बंदरांमार्फत केली जाते. सर्व इच्छुक गुंतवणूकदारांचे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत आहे!